शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन
पुनर्रचित अभ्यासक्रम मसुदा २०१९
इयत्ता अकरावी व बारावी
विषयवार मसुदे
|
अभिप्राय देण्यासाठी साईन अप/लॉग इन करा.

राज्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाची पुनर्रचना व त्यास अनुसरुन नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात येत आहे. प्राथमिक स्तरापासून ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत सर्व विषयांचे अभ्यासक्रम हे चढत्या श्रेणीमध्ये सलग व एकात्मिक स्वरूपात असावेत या दृष्टिकोनातून शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इयत्ता अकरावी व शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता बारावी या दोन इयत्तांना पुनर्रचित अभ्यासक्रम लागू करण्याचे प्रस्तावित आहे. उच्च माध्यमिक स्तरावरील विविध विषयांच्या अभ्यासक्रमाची मांडणी ही नव्याने क्षमता विधानांच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे. इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीच्या संदर्भात विषयनिहाय देण्यात आलेल्या क्षमता विधानांच्या माध्यमातून अभ्यासक्रमाची रुपरेषा स्पष्ट करण्यात आलेली आहे. इयत्ता अकरावीचा विचार करता विषयाचे प्राथमिक ज्ञान अपेक्षित आहे. तसेच इयत्ता बारावीसाठी विषयाचे उपयोजनात्मक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे व त्याचा अवलंब करावा हा विचार ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाची मांडणी ही क्षमता विधानांच्या स्वरूपात निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या त्या इयत्तांमध्ये कोणकोणत्या क्षमता विकसित होतील हे लक्षात येईल.

राज्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम यांची निर्मिती व अंमलबजावणी स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. आता उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनात सलगता आणि सुसूत्रता राहावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सांधेजोड होताना कोणत्याही त्रुटी, विसंगती राहून जाऊ नयेत यासाठी या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रमाचा एकत्रित विचार करण्याची गरज निर्माण झाली होती. या दृष्टीने उच्च माध्यमिक स्तरांवरील अभ्यासक्रमाचा आशय व अपेक्षित अध्ययन-अध्यापन पद्धती या दोन्हींचा एकत्रित आढावा घेण्यात आला. त्या वेळी प्रत्येक इयत्तेच्या अखेर आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर विद्यार्थी नेमके काय शिकले असतील म्हणजेच त्यांनी नेमक्या कोणत्या क्षमता प्राप्त केल्या असतील याची एक सुस्पष्ट आणि सुटसुटीत मांडणी करावी असे ठरवण्यात आले. येथे नमूद केलेल्या विषयवार क्षमता विधानांमध्ये ही मांडणी करण्यात आली आहे. क्षमता विधाने तयार करताना पुढील बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.

१. प्रत्येक विषयाची इयत्तावार चढत्या श्रेणीत सलगपणे मांडणी.
२. ‘माहिती’ मिळवण्यापेक्षा स्वयं-अध्ययन क्षमतेच्या विकासावर भर.
३. शिक्षणाचे दैनंदिन व्यवहारात कृतिशील उपयोजन
४. पुढील शिक्षण, संशोधन, उद्योग-व्यवसाय आदींसाठी आवश्यक ज्ञान –कौशल्यांची पायाभरणी
५. प्रगल्भ आणि जबाबदार नागरिकत्वाचे भान
६. नवनिर्मिती आणि सर्जनशीलतेचा विकास
७. भारतीयत्वाचा सार्थ अभिमान
८. विवेकनिष्ठ दृष्टीकोनाची जोपासना
९. उच्च शिक्षणासाठीची पूर्वतयारी

क्षमता विधानांची मांडणी करताना प्रचलित अभ्यासक्रमातील काही पाठ्यघटक व उपघटक यांचीही फेररचना करण्यात आलेली आहे. मात्र फक्त विषयज्ञानात भर घालण्यापेक्षा त्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने होणाऱ्या क्षमता विकासावर भर देण्यात आला आहे. यास अनुसरुन उच्च माध्यमिक स्तरावरील क्षमता विधानांचे विषयनिहाय मसुदे येथे दिले आहेत.

सदरची क्षमता विधाने ही प्रस्तावित असून आपण आपले अभिप्राय दिनांक 10 मे 2019 पर्यंत नोंदवावेत. क्षमता विधानांच्या सदर मसुद्याबाबत आपले अभ्यासपूर्ण अभिप्राय अपेक्षित आहेत, त्यांचे स्वागत आहे. आपल्या सूचनांचा योग्य तो विचार करुन या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल.