महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.
 
 
 
 
 
 

    विषय : सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करणे आणि शालेय स्तरावर मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते पाचवी या इयत्तांमध्ये गणित आणि विज्ञान हे विषय शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती या शासनाच्या पथदर्शी प्रकल्पांबाबत.

     दप्तराचे ओझे कमी करणे : शालेय स्तरावरील शिक्षण घेणारा विद्यार्थी हा शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. शालेय स्तरावरील शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याला विविध विषयांचे अध्ययन करावे लागते. या अध्ययनाबरोबरच त्याला अभ्यासपूरक असे इतरही ज्ञान अभ्यासक्रमपूरक विषयांच्या माध्यमातून मिळत असते. दैनंदिन शालेय जीवनामध्ये शालेय वेळापत्रकानुसार विद्यार्थी प्रतिदिन विविध विषयांचा अभ्यास करतात. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांना आवश्यक ते सर्व अध्ययन साहित्य सोबत ठेवावे लागते. याचबरोबर जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपासपेटी असेही साहित्य त्यांच्या दप्तरामध्ये असते. याचबरोबर प्रत्येक विषयाचे पाठ्यपुस्तक व त्यासोबत वह्या यांचा समावेश या सर्वामध्ये होतो.

     गेल्या काही वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे सतत वाढत आहे, ही बाब प्रकर्षाने जाणवू लागली. त्या अनुषंगाने चर्चाही खूप झाली. यातून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल, याबाबत अनेक स्तरांतून मतमतांतरे मांडण्यात आली. पालकांपासून ते शासनापर्यंत सर्वांनीच ‘दप्तराचे ओझे’ या विषयाबाबत आपले मत स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल, याबाबत शासन निर्णयाद्वारे काही उपाययोजना सुचवल्या आहेत. पूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे नेमके किती असावे याविषयीसुद्धा साहित्यनिहाय विवरण दिले आहे. यातूनच विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी सर्वच घटकांवर सोपवण्यात आलेली आहे.

     शालेय स्तरावरील विद्यार्थी हा फक्त ज्ञानसंपन्न असून चालणार नाही, तर तो शारीरिकदृष्ट्या सुद्धा सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाठदुखी, स्नायू आखडणे, मणके झिजणे, मान दुखणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, डोकेदुखी, मानसिक ताण असे अनेक आजार/विकार निर्माण होत आहेत. बालवयात जडणाऱ्या या आजारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. आजचा शालेय स्तरावरील विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक असल्याने त्याचे मानसिक, शारीरिक व बौद्धिक आरोग्य उत्तम ठेवणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ओझ्याविना शिक्षण या संकल्पनेच्या माध्यमातून शासनाने काही ठोस पावले उचलली आहेत. शासन निर्णयाच्या आधारे पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन या सर्वांनी करावयाच्या उपाययोजना निश्चित केल्या आहेत. त्यानुसार त्या सूचनांची अंमलबजावणी शासनस्तरावर प्रभावीपणे होत आहे. शालेय स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये पाठ्यपुस्तकांचेही वजन नेमके किती असावे याबाबतची स्पष्टता दिली आहे. या संकल्पनेतूनच शासनामार्फत शालेय स्तरावरील अध्ययन अध्यापन प्रक्रियेसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकाची योजना प्रस्तावित होती. एकात्मिक पाठ्यपुस्तक म्हणजे विद्यार्थ्याने आवश्यकतेनुसार अध्ययन साहित्य सोबत ठेवणे. सद्यस्थितीत प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक दिलेले आहे. विद्यार्थ्याला वेळापत्रकाप्रमाणे सर्व पाठ्यपुस्तके सोबत घ्यावी लागतात. प्रत्येक पाठ्यपुस्तकाचे स्वतंत्र वजन आहे. ही सर्व पाठ्यपुस्तके एकत्र सोबत घेतल्यामुळे साहजिकच दप्तराच्या ओझ्यामध्ये वाढ होत आहे. यामुळे वर्गामध्ये जो विषय शिकवला जात आहे, तेवढेच अध्ययन साहित्य सोबत नेता येईल, यावर विचारविमर्श करण्यात आला व यातूनच शासनामार्फत एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प राबवण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. यामध्ये प्रचलित प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकाचे तीन भाग करून सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांचे एकात्मिक स्वरूपात तीन स्वतंत्र भागामध्ये पाठ्यपुस्तक तयार होईल. त्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे सर्व विषयांचे एकच पाठ्यपुस्तक सहज सोबत शाळेत घेऊन जाणे विद्यार्थ्याला शक्य होणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवी या स्तरावरील विषयांची संख्या कमी असल्यामुळे तीन भाग केले जातील. इयत्ता सहावी व सातवीसाठी विषयांची संख्या जास्त असल्याने आवश्यकतेनुसार चार भाग केले जातील. शालेय विद्यार्थी हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी हा एकात्मिक पाठ्यपुस्तकांचा पथदर्शी प्रकल्प प्रस्तावित करताना आम्हाला आनंद वाटत आहे.

     द्विभाषिक पाठ्यपुस्तक निर्मिती : शालेय स्तरावरील अध्ययन – अध्यापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थी विकासाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विद्यार्थ्याच्या सर्वागिण विकासामध्ये ज्ञानात्मक, बोधात्मक आणि भावात्मक विकासाचा समावेश होतो. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अभ्यासलेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमता विकसित करणे हा ‘ज्ञानरचनावादी’ अध्ययन – अध्यापन प्रक्रियेचा गाभा आहे. या संदर्भानेच शालेय स्तरावरील विद्यार्थी विविध विषयांचा अभ्यास करीत आहेत. शालेय स्तरावर भाषा तसेच भाषेतर विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो. प्रत्येक विषयाची स्वतंत्र अशी उद्दीष्टे असतात. या उद्दीष्टांनुसार विद्यार्थ्यांना अध्ययन- अनुभव दिले जातात. हे सर्व अध्ययन अनुभव हे विविध प्रकारच्या अध्ययन साहित्यातून प्राप्त होतात. अध्ययन साहित्याखेरीज विविध प्रकल्प, कृतींच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थी त्या त्या विषयातील आवश्यक ती सर्व कौशल्ये आत्मसात करतात. हे करताना शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते.

     पाठ्यपुस्तकांच्या आधारे अध्ययन – अध्यापनाची प्रक्रिया पार पाडताना विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील समाविष्ट आशयाचा खूप उपयोग होतो. अभ्यासक्रमानुसार निश्चित करण्यात आलेला आशय हा पाठ्यपुस्तकांमध्ये देण्यात येतो. भाषा विषयांचा विचार करता भाषा विषयक विविध कौशल्ये (जसे वाचन, लेखन, श्रवण, संप्रेषण, स्वमत प्रकट करणे, रसग्रहण करणे इत्यादी) फार महत्त्वाची आहेत. अशा कौशल्यांचा विकास हा गद्य व पद्य स्वरूपात देण्यात आलेल्या आशयाच्या माध्यमातून होत असतो. भाषेतर विषयांचा विचार केला तर गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या भाषेतर विषयांमधील प्रत्येक विषयाची कौशल्ये ही वेगवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी आहेत. प्रामुख्याने गणित आणि विज्ञान या विषयांना खूप महत्त्व आहे. गणित आणि विज्ञान हे विषय मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन व्यवहारात नेहमी अनेक इंग्रजी शब्दांचा वापर होत असल्याचे आपण बारकाईने पाहिल्यास दिसून येईल. जेसे इतरांशी बोलताना, संवाद साधताना आपण अनेकदा मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्द वापरतो. उदाहरणार्थ, विज्ञान विषयातील - टेबल, वॉटर सायकल, रोटेशन, डिस्टंन्स इत्यादी तर गणित विषयातील अँगल, अ‍ॅडिशन, मायनस, इत्यादी.

     प्राथमिक स्तरावर अभ्यासले जाणारे गणित आणि विज्ञान हे विषय पुढील शैक्षणिक स्तरावर म्हणजेच उच्च प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर इंग्रजीमध्ये अभ्यासले जातात. या विषयांमधील अभ्यास अहवाल, संशोधने आणि संदर्भसुद्धा इंग्रजी भाषेत मांडलेले असतात. उच्च शिक्षणाचा विचार करता राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे विषय इंग्रजीमध्येच अभ्यासावे लागतात. प्राथमिक स्तरावर प्रामुख्याने मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयातील विविध संकल्पना, संबोध हे मराठीतून शिकावे लागतात आणि दैनंदिन जीवनात मात्र त्यांचेकडून नेहमी इंग्रजी शब्दांचा वापर होतो. अर्थात हे होत असताना याकडे गणितीय अथवा वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अंगाने पाहिले जात नाही किंवा तशा स्वरूपात त्यांचा पडताळा होत नाही. यातूनच विषयज्ञान आणि प्रत्यक्ष अध्ययन यामध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संकल्पना संबोध यांचे दृढीकरण होत नाही आणि त्या स्पष्टही होत नाहीत. एकंदरीच अध्ययन हे सहज आणि सोपे वाटत नाही.

     गणित आणि विज्ञान या विषयाचे मराठी माध्यमातून अध्ययन होत असताना जर विद्यार्थ्यांना गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पनांचे अर्थ जर इंग्रजीतून कळाले आणि त्याविषयी शिक्षकांनी अध्यापन करताना थोडे स्पष्टीकरण केले तर विद्यार्थ्यांचे अध्ययन सहज – सोपे होईल, असा विचारप्रवाह निर्माण झाला आणि त्यातूनच गणित आणि विज्ञान या प्राथमिक स्तरावरील मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांचे द्विभाषिकरण करावे, असा निर्णय शासन स्तरावर प्रस्तावित करण्यात आला आहे.

     प्राथमिक स्तरावर गणित आणि विज्ञान या विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये विविध संकल्पना आणि संबोधांचे इंग्रजी शब्दार्थ जसेच्या तसे इंग्रजीत देण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठीमध्ये देण्यात आलेल्या शब्दास इंग्रजी भाषेत नेमके काय म्हटले जाते, हे समजेल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन सहज आणि सोपे होईल.

     शालेय वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता पहिली ते सातवी या इयत्तांसाठी मराठी माध्यमाकरीता हे प्रकल्प पथदर्शी स्वरूपात राबवत असताना पहिल्या टप्प्यावर राज्यातील ५९ ब्लॉक्समध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असून या प्रकल्पांची फलनिष्पत्ती व त्यावर आलेले अभिप्राय याचा सर्वांगीण विचार करून संपूर्ण राज्यभर हे प्रकल्प राबवण्याचा शासनाचा मानस आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, ‘बालभारती’ मार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभिनव प्रकल्पांचे आपण सर्वजण निश्चित स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाबाबत आपणास काही सुचवावयाचे असल्यास किंवा आपले मत द्यावयाचे असल्यास पाठ्यपुस्तक मंडळाच्या www.ebalbharati.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नोंदणीवर आपण आपले मत व अभिप्राय नोंदवू शकता. पुढील २० दिवसांसाठी आपले अभिप्राय नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आम्हास आपले अभिप्राय स्वागतार्ह असतील. जेणेकरून आगामी काळात या अभिनव अशा प्रकल्पाची व्यापक स्वरूपात शासनास अंमलबजावणी करता येईल.

     धन्यवाद!

 
चाचणी/ नमुना प्रती इयत्ता पहिली
 
भाग १
 
भाग २
 
भाग ३
 
चाचणी/ नमुना प्रती इयत्ता दुसरी
 
भाग १
 
भाग २
 
भाग ३
 
चाचणी/ नमुना प्रती इयत्ता तिसरी
 
भाग १
 
भाग २
 
भाग ३
 
चाचणी/ नमुना प्रती इयत्ता चौथी
 
भाग १
 
भाग २
 
भाग ३
 
चाचणी/ नमुना प्रती इयत्ता पाचवी
 
भाग १
 
भाग २
 
भाग ३
 
चाचणी/ नमुना प्रती इयत्ता सहावी
 
भाग १
 
भाग २
 
भाग ३
 
चाचणी/ नमुना प्रती इयत्ता सातवी
 
भाग १
 
भाग २
 
भाग ३
 
सोबत देण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांच्या चाचणी/ नमुना प्रतींचे अवलोकन करावे